शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

श्रद्धांजली : बाबूराव बागूल


(१७ जुलै १९३१ - २६ मार्च २००८)

बाबूराव
बागूल यांच्या तीन कविता


१.

तुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर

मनू मानी ज्यांना महाअरी
तिथे तुझा जन्म झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल ‘ आंबेडकर ’
युगांतरकारी ‘ आंबेडकर ’!
क्रांतिकारी ‘ आंबेडकर ’!
मनूचा मर्मांतक वैरी ‘ आंबेडकर ’!
दुसरा पर्यायच नाही
तुला व्हावेच लागेल ‘ आंबेडकर ’!
‘ आंबेडकर ’ एवढा मोठा नाहीस झाला
तरी लहानगा का होईना
आंबेडकरच व्हावे लागेल तुला
तुझ्या बापावरी मजूर नाही,
वा मास्तरही नाही,
कलेक्टरही नाही,
फक्त आंबेडकर होणे आहे तुला
म्हणजे सम्यक क्रांतीला
देशात आणणे आहे तुला !
इथे या देशातील दुष्टांनी
कधी देव होवून
कधी देवावतार होवून
कधी धर्म होवून
फार छळले आहे देशवासीयांना !
स्त्री, शूद्र बहिष्कृतांना !
मूळ मालक असल्यामुळे
एवढे पिडले की,
तुझा संघर्षशील आंबेडकर होण्याविणा,
संगरामागे संगर केल्याविणा
गत्यंतर नाही तुला.
आंबेडकरांचे अनुकरण
करणे जरूर आहे तुला
अनेक युगांनंतर
अनेक एकलव्य, शंभुकांनंतर
एक आंबेडकर
जगू शकले फक्त अन् तू त्यांच्यानंतर
जगलेला !
तुझ्या विकासाला कारण
तू एकटा नाहीस,
आणि नाही हिंदू धर्मपण
तुझ्या विकासाला कारण
आंबेडकर !
हे ध्यानात धर
त्यांचे अनुकरण कर
अथवा दारूण देशभक्त
क्रूर, कठोर क्रांती कर
स्टॅलिन हो !
त्याविना हा भगवान बुद्धाचा
सुफळ, सुंदर, समृद्ध देश
‘ प्रबुद्ध भारत ’ होणार नाही
राहील दंगलखोर कौरव पांडवांचा देश
म्हणून मी म्हणतो
तुला व्हावेच लागेल आंबेडकर
करुणामय, क्रांतिकारक ‘ आंबेडकर ’!
भारत भाग्यविधाता ‘ आंबेडकर ’!

२.

वेदाआधी तू होतास

वेदाआधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून
विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव,
तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस
आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले
हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.
३.

हे नारी

तुझे ललित, सुंदर नारीपण
मनमोहक आहे.
नेत्रसुखद आहे.
तुझ्या सुरेख, सुडौल शरीरावर
निसर्ग आणि नियती
प्रगट करतात तरूणपण
तेव्हा तुझे नश्वर शरीर
होते अजरामर.

अनेक
कलाकृतींचे प्रदर्शन
वा प्रदर्शनीय संग्रहालय
तुझ्या दर्शनानेच कलावंतांना
सुचतात कलाकृती आणि वास्तुशिल्पे
तुझ्या आशयपूर्ण उरोजावरून
देवालयाची मस्तके,
कळस साकार झाले आहेत
आणि ती स्वर्गाशी
सतत संवाद करतात असे मानले जाते आहे.

हे नारी,
तुझे प्रिय प्रेयसीपण तर
पूर्वीपासून काव्यनाटकांना अमर करते आहे.
अन् घरोघरी, सर्वभर
तुझे पत्नीपण सर्व पतींना
स्वर्गासम वाटते आहे.
तुझेच तुझे आईपण तर
परमेश्वराला भारी भरते आहे.
श्रद्धा, भक्तिभाव तुझ्यामुळेच
घरोघरी, मनोमनी आकाराला आलेले आहे.

धर्मप्रचारकांनी हे तुझे महन मंगळपण
त्यांच्या देवासाठी लुटले आहे, लाटले आहे.
तुझे प्रेमळ आईपण पाहून
तुझी सर्व पोरावली माया पाहून
पिता परमेश्वराची कल्पना
प्रेषितांना सुचली.
अशी तू,
सर्व महन्मंगल कल्पनांची माता तू !
पहिल्या प्रेमाची मालकीण तू !
प्रियतमा तू !
स्वर्गाहून सुंदर तू !
प्रिय पत्नी तू !
संसारातील स्वर्ग तू !
वासना विकारांचा वसंतोत्सव तू !
देव, धर्म, देवळांहून भारी तू !
नारी म्हणूनही
आई म्हणूनही !

(सौजन्य : म.टा.दि.२७ मार्च, २००८)

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार