नवीन ब्लॉग : नाथमाउली

हातरूण हे महाराष्ट्रातील छोटेसे आडवळणी गाव . अकोला जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पस्तीस कि.मि. अंतरावर. नाथा बाबा ह्या थोर संताच्या वास्तव्याने ते तीर्थ झाले.नाथ बाबांचे लौकिक नाव महादेवनाथ यादवनाथ पारसकर.उण्यापु-या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात लोकमानसावर संस्कार करणारे ते चालते बोलते लोकविद्यापीठ होते.त्या महान संताच्या चरणी ही विनम्र श्रद्धांजली... येथे वाचा

खरी मौज तर जगण्यात आहे



प्रिय,

आपण धावत असतो सवयीने,
आणि जगत असतो अंदाजाने.

चालता चालता थकतो
नि अनेकदा परत फिरतो;
पण, रेटा एवढा जोराचा की
पुन्हा फिरून धावत सुटतो.

शिल्लक काही इंधन नसते 
तरी चालण्याचे बंधन असते
म्हणून आपण राहतो चालत
म्हणून आपण राहतो जगत
पण, काहीतरी घडते असे की
पूर्वीची स्वप्नंही मग नाहीत पडत
पडली तरी आपण ढुंकूनही नाही बघत
रोजचे रणांगणच असे असते
की तिथेच सारे गुंतणे होते
मग हरवून बसतो आपण आपला आवाज
हिंदोळणा-या समुद्राची जातो विसरून गाज
तरीही आपण चालत असतो
एका क्लिकसरशी
प्रॉब्लेम सोडवू पाहतो
पण असे काही होत नाही

मग होते चिडचिड किंवा संताप संताप
तो सोडून देतो कधी धूम्रवलयात
कधी ग्लासमध्ये करतो रिते फ्रस्ट्रेशन
मनात तर व्यापलेले रोजचे डिप्रेशन
यानं यॉंव केलं, तिकडं त्यानं त्यॉंव केलं
त्याला शाप देण्यासाठी तुम्ही काव केलं
तुमच्या शापानं तो काही मरत नाही
असल्या कशानं तू काही जगत नाही

इकडे आड, तिकडे विहीर
सोडताही येत नाही
अन् पोहताही येत नाही
तरी आपण राहतो जगत
आजचं मरण उद्यावर टाकत

जग सारं शत्रू आहे असं वाटू लागतं
कोणीच माझं नाही हेही पटू लागतं
पण तरी मला धावायचं असतं
कारण मला जिंकायचं असतं
पण यश हे हवेसारखं, ते वा-यासारखं
दिसतही नाही नि पाठही सोडत नाही

फ्रेश  स्वप्नं पाहायला हवीत हे खरं;
पण ती कुठल्या मॉलमध्ये हे ठाऊक नाही
स्वत:ला बदलायला हवं हे खरं;
पण म्हणजे काय करायचं ते माहीत नाही
अशावेळी दोस्त,
एक बराक ओबामा भेटतो
‘धिस इज युवर टाइम’
तो स्वच्छ हसत स्पष्ट सांगतो
जग बदललंय् तो म्हणतो
आणि त्याचा खणखणीत पुरावा देतो
गाण्यातली पहिली ओळ तो गुणगुणतो
आणि मग अख्खं गाणं आठवू लागतं
अरे, हे तर गाणं माझंच
याला ठाऊक कसं झालं, वाटू लागतं

तेव्हा प्रिय,
मोबदला नाही, बदला नाही
बदल आता ठरला आहे
यशासाठीच तर जन्मलो आपण
संशय सारा फिटला आहे
नवे जग माझे आहे, नवे जग तुझे आहे
नवजात बच्चूप्रमाणे नवे जग ताजे आहे
आव्हाने असतील शंभर;पण
आयुष्यही शंभर नंबरी सोनं आहे
भिंती पडल्या, सेतू आले अन्
हाच नव्या जगाचा ओनामा आहे
खरं सांगतो दोस्त,
तुझ्या-माझ्यातही दडला एक ओबामा आहे !

तुलाही भेटावा तो
तो मलाही भेटावा

मग रुंद होऊन जाव्यात शक्यतांच्या कक्षा
नव्या जगाने द्यावी यशाची नवी दीक्षा
युजरनेम टाइप केले ‘सक्सेस‘, तर
‘फरगॉट पासवर्ड?’
असा प्रश्न निर्बुद्ध संगणकाने मग विचारू नये
अन् हा पासवर्ड शोधण्यासाठी
इतरांच्या कॉम्प्युटरमध्ये डोकावण्याची वेळ येऊ नये
...म्हणून हे सारे लिहिले

बाकी लिहिण्यात काय आहे?
बाकी वाचण्यात काय आहे?
खरी मौज तर जगण्यात आहे !

सो ! येस, वी कॅन.

- संजय आवटे
    9881256009
(‘बराक ओबामा बदलत्या जगाचा ‘सक्सेस पासवर्ड’’ या बहुचर्चित पुस्तकातून साभार)

ग्लोबल मेंदीची नक्षी

१.
माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.

२.
गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.

३.
न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.

४.
वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्‍या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्‍याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.

५.
तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्‍या
म्हातार्‍या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.

६.
काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.

७.
मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?

- अजीम नवाज राही


(पूर्वप्रसिद्धी : ‘मौज’ दिवाळी २००८)

ओढ



धु-यावर तुरे 
गवताचे; 
बैल ओढतात
आवताचे.

तान्ह्या गाईला
हिरवं गवत;
शेजारी भाकड
जळते सवत.

हिरव्या गवताचा
हिरवा वास;
घालावा वाटतो
तोंडात घास.

-इंद्रजित भालेराव
  एकनाथनगर,
  परभणी
  431401

नूतनवर्षाभिनंदन

तो खरा असतो कवी

सोसण्याचा सूर करतो तो खरा असतो कवी;
देखणे जो दु:ख करतो तो खरा असतो कवी.

मौन ज्याचे बोलके अन् बोलताना मौन तो;
जो मुक्याचा शब्द होतो तो खरा असतो कवी.

क्रौंच मरतो,पाहताना जो स्वत: घायाळतो;
वेदनेचे वेद करतो तो खरा असतो कवी.

सत्य ज्याच्या जीवनाचे सार अन् आधारही;
शीव,सौंदर्यास जाणे तो खरा असतो कवी.

दंभ ज्याला साहवेना,बंड जो करतो सदा-
ज्ञानराया वा तुक्यासम;तो खरा असतो कवी.

जीव पायी अंथरोनी नम्रता सांभाळतो,
आढ्यतेला जाळतो जो;तो खरा असतो कवी.

तापतो,संतापतो पण शांतही तो राहतो;
गारवा देतो जगाला तो खरा असतो कवी.

शब्द होती शास्त्र ज्याचे,शब्द होतो अस्त्रही;
जो शिवी-ओवीस गातो तो खरा असतो कवी.

निर्मितीचा ध्यास ज्याला,सुंदराचा श्वास तो;
इश्वराचे रूप दुसरे तो खरा असतो कवी.

- कमलाकर देसले
९४२१५०७४३४

अपराधी

कोवळ्या गोर्‍या अंगावर
फोकाने हिरवे वळ उमटवीत
पोराला शाळेत नेणार्‍या बापाने
आज काठीच्या आधाराने
वार्धक्याचा तोल सांभाळीत
सामानाबरोबर आणली दारू
कामावरून थकून भागून आलेल्या
त्याच पोरासाठी,
तेव्हा मला वाटला तो अपराधी
जगण्यासाठी
त्याच्यातल्याच बापाला ठार मारणारा.

- दिनेश गावंडे
९३७२४५११५४

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार