शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

विश्वसुंदरी

तू विश्वसुंदरी झाल्याच्या बातमीने
झळकले होते प्रत्येक वृत्तपत्राचे पान
तेव्हा माझीही फुगली होती छाती
आणि उंचावली होती मान.


तुझ्या आदर्शाविषयी ऐकून
तर फार बरे वाटले होते.
पण ओठांची लिपस्टिक सांभाळत
तू केलीस भाषा इथली गरीबी नष्ट करण्याची
तेव्हा थोडे खटकलेही होते.
आणि मंचावरून तोकड्या कपड्यात
ठुमकत कमरेला झोके देत चालताना पाहून
मला आठवली होती
सांजच्याला जळणासाठी
डोक्यावर काटेरी मोळी घेऊन
कामावरून घराकडे परतणारी
माझ्यागावातील सावित्री.
तिचाही परकर फाटलेला मांडीवर;
फरक एवढाच की तेव्हा ती झाकत होती
आणि तू दाखवीत होतीस सार्‍या जगाला...

आता तू दिसतेस टीव्हीवरच्या जाहिरातीत
कंपनीच्या साबणाने आंघोळ करताना
किंवा क्रिम लावताना.
पण तुझ्या स्पर्शाने महाग झालेला साबण,क्रिम
विकत घेण्यासाठी दिवसभराची मजुरी
दुकानदाराला देते तुझी काळी बहीण
सोयरीक जुळत नाही म्हणून...

तेव्हा मात्र तू उतरतेस माझ्या नजरेतून
तुझ्याच मेक-अपसारखी,
आणि नक्षीचा मुकुट दोक्यावर घेऊन
वावरणारी विश्वसुंदरी बसते मनात
काटेरी घर करून.


- दिनेश गावंडे
९३७२४५११५४
(कविता-रती/जानेवारी-फेब्रुवारी २००५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार