शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

स्त्रीमुक्ती डॉट कॉम...




रेखाचित्र : श्रीधर अंभोरे

खून, बलात्कार हुंडाबळीच्या
सायबर युगातील अत्याचारग्रस्त
निरागस मुलींना
शुभेच्छा स्त्रीमुक्ती दिनाच्या -


*

आज आठ मार्चला तुम्हीही
कदाचित स्त्रीमुक्तीच्या गप्पा मारल्या असत्या...
पोट भरलेल्या स्त्रियांसमोर
केला असता उपदेश
आकाश कवेत घेण्याचा,
स्वत:च्या पायावर विश्व उभारण्याचा,
घराघरात सुरक्षित असणार्‍या आया- बहिणींनी
वाजविल्या असत्या टाळ्या
आणि कुजबुजल्या असत्या आप-आपसात ...
बघा... ताईंनी कसा घातला काळजाला हात...


*

स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारता मारता
शिक्षणातून आत्मभान जागृत झालेल्या
तुम्ही समजदार मुली
माणूसपणावर टाकता विश्वास
आणि
माणसांनीच केला तुमचा घात.
आता माणसंच बोलतात-
लेकी-बाळीने घेऊ नये
इतका मोकळा श्वास...


*


जागतिक स्त्रीमुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला
महिला मुक्तीच्या स्वयंघोषित नेत्या म्हणाल्या,
“स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडणारी कविता सांग”
गंगेवर आंघोळ करीत बसलेल्या
एका म्हातारीची सांगितली मी गोष्ट तिला


अंगातून रक्त निघेपर्यंत दगडाने कातडी घासत बसलेल्या
म्हातारीला एका काळ्या डगल्यावाल्याने विचारले,
“ही कोणत्या जन्माची आंघोळ?
की केला होतास गंगेला नवस?”
म्हातारी म्हणाली,
“ही आंघोळही नाही आणि नवसही नाही
फक्त
आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या
लोकांच्या नजरा घुते...”


*

तुझ्याही पिंडाला असाच कावळा शिवला
आणि चारित्र्याची चिरफाड केली
खोटा आव आणणार्‍यांनी...
गाव-गावच्या आसरा आता बोलू लागल्यात
बाईच्या कपाळावर चारित्र्यासारखा शाप नाही...
आज तुला मिळालेला हा खरा न्याय नाही...


*

रिंकू पाटील ते भारती पाटील
तुम्ही आहात ‘वर्षा’नुवर्षे न्याय न मिळालेल्या
अहिल्येच्या लेकी
भविष्यात न्यायदेवता सोडेल डोळ्यावरचं चिरोटं
पण राख झालेल्या तुमच्या स्वप्नांना
खरंच न्याय मिळेल का?
तुमच्यासारख्या अल्लड मुली
पुरुषजातीवर विश्वास ठेवतील काय?
आमच्याच लेकी-बाळींना आज
स्त्रीमुक्तीच्या गप्पा सांगतांना
आम्हालाच आमची लाज वाटते.


- नरेंद्र लांजेवार

९४२२१८०४५१

(प्रसिद्धी : ‘लोकमत’ दि. ८ मार्च, २००८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार