शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.
विंदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विंदा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अमृतानुभवाचा सारांश : विंदा








.. देणा-याने देत जावे ; 
घेणा-याने घेत जावे ; 
घेता घेता एक दिवस 
देणा-याचे हात घ्यावे! 
..................................... 


... आहे दु:ख तेच फार ; 
माझ्या मना कर विचार ; 
कर विचार ; हस रगड ; 
माझ्या मना बन दगड! 
...................................... 


... आत्माही तोच तो ; 
हत्याही तीच ती! 
कारण जीवनही तेच ते! 
आणि मरणही तेच ते! 
..................................... 


.
.. जिकडे तिकडे मुकी धडे ; 
इतिहासाला गेले तडे ; 
त्यात नवीन काय घडे ? 
तुझी माझी धाव आहे 
दातापासून दाताकडे. 
.......................... 


इतिहासाचे अवजड ओझे 
डोक्यावर घेउन ना नाचा 
करा पदस्थल त्यांचे आणिक 
चढुनी त्यावर भविष्य वाचा. 

करंदीकरांचे अखंड 'उद्योग' : सुमा करंदीकर



१९७६ साली करंदीकरांनी एस.आय.ई.एस. कॉलेजमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यांचे दोन विद्याथीर् एस.आय.ई.एस.मधेच यांचे सहकारी प्राध्यापक होते. १०+२+३ अशी नवी शैक्षणिक पद्धत सुरू झाल्यावर कॉलेजमधील इंग्रजीचे दोन प्राध्यापक कमी करायला लागणार होते. हे दोन तरुण प्राध्यापक सगळ्यांत ज्युनिअर असल्यामुळे त्यांच्या नोकऱ्या जाणार होत्या. या प्राध्यापकांची पंचविशी उलटलेली; त्यामुळे दुसऱ्या नोकऱ्या मिळणे कठीण. तेव्हा ही तरुण मुले बेकार होऊ नयेत म्हणून, कॉलेजमधे सर्वजण आग्रह करत असतानाही, यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडण्याचे कारण 'स्वेच्छानिवृत्ती' असे सांगितल्यामुळे पुढे सुरू झालेल्या पेन्शनच्या योजनेचाही यांना फायदा मिळाला नाही. 


या पेन्शनवरून आठवले : हे भागानगरच्या सत्याग्रहात हैदाबाद तुरुंगात होते, तेव्हा स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शनही यांना मिळाले असते. या पेन्शनसाठी अर्ज करावा असे अनेकजण सांगत होते. औरंगाबादचे थोर कार्यकतेर् व दैनिक 'मराठवाड्या'चे संपादक अनंत भालेरावपण या पेन्शनसाठी यांनी अर्ज करावा असा आग्रह करत होते. पण करंदीकरांनी पेन्शनसाठी अर्ज केला नाही. यांचे म्हणणे : 'तरुणपणी देशासाठी अर्पण केलेली एक पाकळी. त्यामुळे माझं काही नुकसान झालेलं नाही. माझं शिक्षण पूर्ण झालं. नोकरी आहे. मी अन्नाला महाग नाही. तेव्हा या तुरुंगवासासाठी मी स्वातंत्र्यसैनिकाचं पेन्शन घेणार नाही.' असा हा सर्व प्रकार. 


करंदीकर कोणताही निर्णय पूर्ण विचार करून घेतात व मग त्यात बदल संभवत नाही. कॉलेजमधून 'स्वेच्छानिवृत्ती' घेतल्यानंतर अनेक उच्चपदस्थांनी यांना अनेक मानाची व पैसा मिळतील अशी पदे सुचवली, ती स्वीकारण्यासाठी गळ घातली; पण यांचा ठाम नकार. साठीच्या नंतर निर्णय घ्यायला लागणारे कोणतेही पद स्वीकारायचे नाही, तरुणांना संधी मिळावी व त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा ही इच्छा. आता काव्यवाचनाच्या कार्यक्रमालाही फारसे जात नाहीत. त्यांना आता प्रवासाचा त्रास होतो व त्यापेक्षा तरुण, नव्या कवींना संधी मिळावी ही इच्छा असते. आता फक्त मुंबईतच योग्य वेळ व योग्य मानधन असल्यास जातात. यांनी १९८१ साली लेखननिवृत्तीपण जाहीर केली. कधीकधी या ठाम निर्णयामुळे जवळची माणसे दुखावतात. कधीतरी अपवादही करायला लागतो, हे यांना पटतच नाही. अमेरिकेतील यांचे परमस्नेही ए. के. रामानुजन यांनी करंदीकरांना 'इंडिया फेस्टिवल'मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत बोलावले होते; करंदीकरांनी आपल्याच कवितेवर बोलावे असे त्यांनी सुचवले होते. 'मी आता हे थांबवलेलं आहे; तेव्हा मी यात भाग घेऊ शकणार नाही,' असा करंदीकरांचा ठाम नकार. रामानुजन निश्चितच दुखावले; पण नंतरही हिंदुस्थानात आले म्हणजे ते प्रेमाने नेहमीप्रमाणे आमच्याकडे येत राहिले हा त्यांचा मोठेपणा. 


यांच्या या घट्ट निर्णयाचा मला स्वत:ला मात्र फायदाच झालेला आहे. हे पक्के निरीश्वरवादी व पाखंडी; माझा परमेश्वरावर पूर्ण विश्वास व मी श्रद्धाळू. माझ्या श्रद्धेला यांनी कधी विरोध केला नाही. (गंमत म्हणजे, करंदीकरही श्रद्धाळू. नसले तरी काही संस्कारांना महत्त्व देत असावेत. त्यांना त्यात काव्य दिसत असावे! ते स्वत: स्नान करताना 'गंगासिंधुसरस्वती' हे मंगलाष्टक, शंकराचार्यांचे 'परापूजा' स्तोत्र व शेवटी 'गायत्री मंत्र' म्हणतात; एवढेच नव्हे, तर तो गायत्री मंत्र त्यांनी नातवंडांनाही अर्थासकट शिकवला आहे.) मद्य यांना र्वज्य नाही; पण 'घरात मद्य आणणार नाही,' असा मला दिलेला शब्द त्यांनी आजतागायत पाळलेला आहे. 


मी सातआठ वषेर् दादरच्या कमला मेहता अंधविद्यालयातील विद्याथिर्नींना आठवड्यातून दोन दिवस शिकवायला जात असे. करंदीकरपण अंधशाळेत माझ्याबरोबर येत असत. ते मुलींना हवी असतील ती पुस्तके वाचून दाखवत असत. त्या अंध मुलींचे अत्यंत आवडते पुस्तक : 'माझी नीता.' हे पुस्तक दोनतीन वेळा वाचले गेले. आपल्या अंधपणापेक्षाही काही मोठे दु:ख असते या जाणिवेने मला वाटते त्यांना ते पुस्तक प्रिय असावे. करंदीकर वरळीच्या अंधांसाठी असलेल्या संस्थेमधेही जात असत. त्या संस्थेत अंधांसाठी ब्रेल लिपीत नसलेली पुस्तके वाचत असत. त्याची टेप करून ती गरजू मंडळींना पाठवली जात असे. या ठिकाणी कॉमर्स, लॉ, एकॉनॉमिक्स अशी अनेक विषयांवरील पुस्तकांची मागणी असे. तिथे गरजू अंधांसाठी करंदीकरांनी अनेक पुस्तके वाचून टेपवर आणली. 


आमच्या शेजारीच 'पत्रकार-नगर'मधे परिमला भट ही जन्मांध मुलगी राहायची. हिचे प्रचारातील नाव 'परी'. ही खरोखरच नावाप्रमाणे परीसारखी सुंदर. अतिशय बुद्धिमान, करंदीकर खूप दिवस हिला वाचून दाखवायला जात असत. तिची आवड सर्वव्यापी, ज्ञानेश्वरीपासून 'फेमिना'पर्यंत. ती बी.ए. झाली, एल्एल.बी. झाली, एम.बी.ए.सुद्धा झाली आणि आता इंडिअन एअरलाइन्समधे मोठ्या अधिकारावर नोकरीला आहे. तिचे लग्न झाले, यजमान सोशलवर्कर आहेत. आता तिला दोन सुरेख मुली आहेत. आनंदात नोकरी आणि संसार सुरू आहे. या परीचा आणखी एक पराक्रम : दोन वर्षांपूवीर् ती आणखी काही अंधांना घेऊन हिमालयावर स्वारी करून आली. 


'आनंदवना'त आल्यावर करंदीकरांचे साहित्यिक यश वाढतच गेले. 'आपल्याला लायकीपेक्षा जास्त यश मिळालं!' असे करंदीकर कधीकधी म्हणत असले तरी त्यांना खरेच तसे वाटते की काय याबद्दल मला संशय आहे. या यशाचे बरेचसे श्रेय ते आपल्यावर संस्कार करणाऱ्या लेखकांना व विचारवंतांना देतात; थोडे आपल्या प्रकाशकांना -विशेषत: रामदास भटकळ व श्री. पु. भागवत यांना- देतात; थोडे आपल्या समीक्षकांना व रसिकांना देतात; आणि उरलेले आपण घेतात. पण यातला एखादा टक्का चुकूनही मला दिलेला कधी आठवत नाही! ('स्वेदगंगा' माझ्या स्वेदानेच प्रकाशित झालेली असूनही!) करंदीकरांचे मत काहीही असले तरी त्यांचा साहित्यिक संसार हा मी माझ्या संसाराचाच एक भाग समजते. 


माझ्यासारख्या सामान्य गृहिणीला कुटुंबातील सर्वांचा भाग्योदय हाच आपला भाग्योदय वाटतो. ही माझी मर्यादा आहे की शक्तिस्थान आहे हे मला समजत नाही. कुणी गमतीने असेही विचारील. की तुमच्या स्वत:च्या लिखाणाविषयी काय? त्याची हालहवाल? माझे लिखाण ही क्वचितच घडणारी घटना आणि त्या लिखाणाची कुवतही बेताचीच; त्यामुळे त्यात प्रकाशकांना किंवा इतरांना फारसा रस वाटण्याचे कारणच नाही. तरी पण भाग्य म्हणावे असे प्रसंग मीही अनुभवले आहेत: गिरिजाबाई कीरांनी माझ्या हस्तलिखित कथा वाचल्या आणि त्यात रस घेऊन त्या काही मासिकांतून छापून प्रसिद्ध केल्या, ते मी माझे भाग्यच समजते. वीस वर्षांपूवीर् आमच्या लग्नाच्या तिसाव्या वाढदिवशी रात्री यांनी आपल्या जवळच्या स्नेह्यांना जेवायला बोलावले. त्यात फक्त पेंेडसे, महादेव जोशी, पाडगावकर, बापट व श्ाी. पु. भागवत हेच होते. जेवण झाल्यावर उदयने त्या सर्वांसमक्ष माझे 'सावली' या नावाचे चोवीस कथांचे छापील पुसतक पेंडशांच्या हस्ते मला दिले आणि त्या विशिष्ट प्रतीवर स्वत: हाताने लिहिलेला मजकूर वाचून दाखवला: 'तुला नकळत, तुझ्या परवानगीशिवाय, तुझा कथासंग्रह मी भाऊंच्या व भागवतकाकांच्या कटात सामील होऊन प्रसिद्ध केला,' वगैरे. मी थक्क झाले! त्या भाग्याच्या क्षणी मला भरूनच आले. (पुढे हा उपद्व्याप घरच्यांनी स्वत:च्या पैशाने केला हे कळले, तेव्हा रागही आला!) 'सावली' हा माझा एकमेव कथासंग्रह; त्यानंतर माझ्या दहा-पंधरा कथा मासिकांतून प्रसिद्ध झाल्या; पण त्यांचा संग्रह निघालेला नाही. माझ्या 'सावली'वर अनुकूल अभिप्राय व्यक्त करणारे राम पटवर्धन यांनी रेडियोवर भाषण दिले; तो प्रसंग मला भाग्याचाच वाटला. को. म. सा. प. च्या सावंतवाडीच्या संमेलनात एका परिसंवादाची अध्यक्ष म्हणून मी जे निवेदन वाचले ते अशोक जैन यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये छापल्यामुळे भलतेच गाजला. मला चाळीस-पन्नास फोन आले. (यांनद्धही कधी इतके फोन आलेले नाहीत!) त्यात श्ाीमती दुगाबाई भागवतांचा फोन आला तेव्हा मला ती घटना मोठीच भाग्याची वाटली; किंबहुना, तो फोन आला म्हणूनच मला ही 'रास' रचावीशी वाटली. यांनी १९८१ सालीच लेखनसंन्यास घेतला. (सांसारिक संन्यास घेतला नाही हेच पुष्कळ!) मी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्याने मला तसला लेखनसंन्यास वगैरे घ्यावा लागणार नाही, हेही माझ्यासारखीचे भाग्यच! 


आता आम्ही दोघेही निवृत्त आहोत. 'आनंदवना'त धाकटा मुलगा उदय आणि सून प्रतिमा यांच्याजवळ आम्ही राहतो. यांच्यामागे अनेक उद्योग असतातच. चपला दुरुस्त करणे, भाज्या आणणे, प्रत्येक बाबतीत बारीकसारीक सूचना करणे ही सर्व कामे हे लेखनाइतकीच मन लावून व एकाग्र होऊन करतात. सुतारकाम हे तर व्यसनच. पूवीर्प्रमाणे अजूनही सुतारकाम सुरूच असते. सध्या साहित्य-सहवासाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. आमच्या 'आनंदवाना'ची दुरुस्ती झाली; पण या दुरुस्तीत अनेक ठिकाणी भिंतीवर हरतऱ्हेचे डाग पडलेले होते; काही भाग विरूप झाले होते, बघवत नव्हते. यांनी स्वत: रंग आणून, त्यात हरतऱ्हेची मिश्ाणे करून सर्व घर पुन्हा सुबक केले. बाहेरची गॅलरी तर शिडीवर चढून सगळीकडे पुन्हा रंग वगैरे लावून छान केली. हे गॅलरीचे काम करत असताना ते शिडीवरून खाली उतरेपर्यंत माझा जीव टांगणीला लागलेला असे. उदयने 'भाऊ, तुम्ही हे काम करू नका,' म्हणून कितीदा सांगितले, पण व्यर्थ. ही सर्व कामे किंवा गच्चीत जाऊन अँटेनाची दुरुस्ती ही सर्व, यांची परम आनंदाची कामे व मोठी करमणूक. 


घरकामात मदत करायची यांना अतिशय इच्छा. आता सूनबाई कर्तबगार आहेत, त्यामुळे फारशी संधी मिळत नाही. पण आमच्या तरुणपणी हे खरोखरच खूप मदत करत असत. माझी नोकरी व घरातले काम, त्यामुळे आपली मदत अत्यंत आवश्यक आहे; अशी यांची खात्री होती आणि थोडे खरेही होते. स्वयंपाक करण्याची यांना प्रचंड इच्छा व हौस. हरतऱ्हेची नवी मिश्ाणे करण्याचे मला सल्ले देण्याचीही. मी सहसा हे सल्ले जुमानत नसे ते सोडा. आमच्या शाळेत गॅदरिंग वगैरे असले म्हणजे मला रात्री घरी यायला उशीर होत असे. तेव्हा मी दुपारीच दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवत असे. इथे 'साहित्य-सहवासा'त राहायला आल्यावर एकदा शाळेत अनपेक्षित काम निघाले; त्यामुळे घरी यायला उशीर झाला. घरी गेल्यावर पटकन काय करता येईल याचा विचार करतच मी जिना चढत होते. दार उघडल्याबरोबर हे स्वैयंपाकघरातून ओरडले. 'हातपाय धुऊन पानावर चला. स्वैयंपाक तयार आहे. मस्त रस्सा केला आहे.' मी न्हाणीघरात हातपाय धुताना म्हणाले, 'हो, आलेच. मला आलाच वास.' टेबलावर पाने घेतलेलीच होती. जया व नंदू मोठी होती, ती कुजकेपणाने म्हणाली, 'आई, भाऊंनी खास तुझ्यासाठी रस्सा केलेला आहे. मस्तच झाला असणार. पण आम्हाला आज फारशी भूक नाही. तेव्हा आम्ही जेवणार नाही.' मी पानावर बसले. पानात खास बनवलेला रस्सा : अख्खे कांदे, बटाटे, वांगी, लाल भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी व रस्सा मिळून येण्यासाठी त्याला कुळथाचे पीठ लावलेले. हरे राम! पण नवऱ्याने एवढ्या कौतुकाने केलेला रस्सा- 'छान, छान!' म्हणून खाणे भागच होते. 


मुलांच्या बाबतीत हे फार हळवे आहेत. हे सकाळी गॅलरीत असले व लहान मुले शाळेच्या बससाठी उभी असली, की पोरे सुखरूप बसून बस सुटेपर्यंत हे अस्वस्थ असतात. वाट चुकलेली शाळेची पोरे नेहमीच यांनाच भेटतात. एकदा रुइया कॉलेजमधून परत येत असताना बाराच्या सुमारास 'प्लाझा' टॉकीजजवळ यांना एक दहा-बारा वर्षांचा, गळ्यात दप्तर अडकवलेला, कावऱ्याबावऱ्या चेहऱ्याचा मुलगा दिसला. तो रस्ता चुकला होता. त्याला धड घराचा पत्ताही सांगता येईना. त्याला बरोबर घेऊन तो सांगेल तसतसे हे जात होते. शेवटी सेनापती बापट मार्गावरील एका चाळीत त्याचे घर सापडले. यांनी मुलाला बापाच्या ताब्यात दिले. पोराचा बाप भलताच चक्रम! त्याने आधी पोराच्या एक कानफटीत मारली. पोराला घरी आणून सोडल्याबद्दल यांचे आभार, कपभर चहा तर लांबच राहिला, उन्हातून तळतळत गेले तर भांडेभर पाणीपण विचारले नाही. 


यांच्या स्वैयंपाकातल्या लुडबुडीसारखाच आमच्या घरातला आणखी एक वादविषय म्हणजे कपडे. हल्ली यांचा पोशाख म्हणजे लेंगा व खादीचा लांब बाह्यांचा कुडता. प्राचीन काळी कॉलेजात असताना शर्टपँट वगैरे वापरत असत. 'फुलब्राइट स्कॉलरशिप'मुळे हे १९७६ साली अमेरिकेत गेले, तेव्हा यांनी दोन सूट केले होते. परत आल्यावर त्यातला एक कोट पाडगावकरांना बरोबर होतो म्हणून दिला व एक कोट कपाटात आहे. त्यांच्या खिशाचा उपयोग जास्तीच्या किल्ल्या, रूमाल वगैरे ठेवण्यासाठी होतो. अमेरिकेतून येताना यांनी चार टेरेलिनचे फूल र्शट्स आणले. हे शर्ट म्हणजे मला एक डोकेदुखीच आहे. ते काही केल्या फाटत नाहीत. त्यांच्या कॉलरी शिवा, गुंड्या लावा- सतत सुरूच असते. प्रथम फूल र्शट्स होते ते बाह्या दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेल्यामुळे आता जवळजवळ २५-३० वर्षांनी हाफ र्शट्स झाले, एवढाच फरक. मला स्वत:लाही फारसा कपड्यांचा शौक नाही. या पन्नास वर्षांत दोघांनी जाऊन माझ्या साड्या घेतल्याचे आठवत नाही. एखादवेळेस कोणती साडी नेसू असे विचारल्यास, 'नेस ग काहीही, छान आहे!' हे उत्तर. आता कधी तरी मुलगी, सून कौतुकाने एखादी साडी आणतात ते सोडा. 


करंदीकरांना करुणेचे झटके येतात. कागलला आलेला करुणेचा झटका पूवीर्च सांगितला आहे. 'साहित्य-सहवासा'त आलेला एक झटका सांगते : मी शाळेत गेले होते. हे घरी एकटेच होते. साधारण दुपारी दोनच्या सुमारास यांना रस्त्यावरून सुरेल गाण्याचे स्वर ऐकू आले. म्हणून हे गॅलरीत पाहायला गेले. रस्त्यावर एक भिकारी गात होता. गळ्यात अडकवलेली एक मोडकी पेटी; पण भिकाऱ्याच्या गळ्यात गोड सूर. बरोबर बायको व तिच्या कडेवर एक मूल. यांनी त्या सगळ्या कुटुंबाला वर घरी बोलावले. ती मंडळी घाबरतच वर आली. त्यांना वाटत होते भर दुपारी रस्त्यात गात हिंडल्याबद्दल साहेब फैलावर घेणार. पण साहेबांनी अगत्याने त्यांची चौकशी केली, चहा करून दिला, मुलाला खाऊ दिला. इथपर्यंत सर्व ठीक. शेवटी ते भिकारी कुटुंब जायला निघाले तेव्हा यांनी माझी चांगली बाजाची पेटी आणली व त्या भिकाऱ्याला फार आग्रह करून ती देऊन टाकली. मी घरी आल्यावर 'तुझी पेटी भिकाऱ्याला देऊन टाकली, फार सुरेख गात होता; पण त्याची पेटी मोडली होती. तुझी पेटी घरात पडून होती. त्याला बिचाऱ्याला उपयोग होईल. इथे घरात फुकट अडगळ आणि झुरळांचा त्रास!' मी अवाकच झाले. माझ्या मामांनी मला कौतुकाने दिलेली पेटी. हल्ली मी ती वाजवत नसे हे खरे; पण एके काळी मी बऱ्यापैकी गाणे म्हणत असे. माझी पेटी, माझ्या गैरहजेरीत, मला न विचारता देऊन टाकून हे मोकळे. औदार्याचा हा एक कोकणी प्रकार असावा! करंदीकर कोकणी आहेतच. तेराव्या वर्षापासून तेविसाव्या वर्षापर्यंत शिक्षणासाठी कोल्हापूरला राहत असले तरी त्या वेळी यांचा गावाशी असलेला संबंध तुटलेला नव्हता. प्रत्येक मोठ्या सुट्टीत हे घरी येऊन वडिलांना शेतीच्या कामात मदत करत. गुरे राखणे, शेणगोठा करणे, जोत धरणे, ढेप फोडणे, गुठावणे वगैरे कामात हे सहभागी होत. पुढे नोकरीला लागल्यावर गावाशी संबंध तुटत चालला; आणि आता आम्हाला कोकणातल्या त्याच त्याच आठवणी पुन: पुन्हा सांगत बसणे एवढाच संबंध. म्हणजे अजूनही हे कोकणाने पछाडलेले आहेतच. 'आपण माधव जूलियनांचे शिष्य आहोत,' ही गोष्ट जितक्या अभिमानाने इतरांना सांगतात, तितक्याच अभिमानाने 'मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे' ही गोष्टीही ते पुन: पुन्हा आम्हाला ऐकवतात. 


या शेतकऱ्याच्या मुलाला काहीतरी उद्योग काढून शारीरिक श्ाम केल्याशिवाय चैनच पडत नसावे. ज्याला मी उद्योग म्हणते त्याला शेजारीपाजारी बहुधा 'उपद्व्याप' म्हणत असतील! त्याची दोनतीन उदाहरणे : इथे आल्यानंतर दरवषीर् पावसाळ्याच्या सुरुवातीला 'साहित्य-सहवासा'तून जाणारा नाला साफ करण्याचा उद्योग. हे स्वत: खोरे घेऊन तो उद्योग करू लागत व सुरुवातीला येथील पाचसहा मोठ्या मुलांना मदतीला घेत. पुढे काही वेळेला धर्मवीर भारती, बांदिवडेकर वगैरे मोठी मंडळीही यांच्या त्या उद्योगात सहभागी झालेली मी पाहिली आहेत. पण मुले मात्र शेवटपर्यंत असत. दुसरा उद्योग म्हणजे इमारतींच्या भिंतीतून वाढणारी छोटी झाडे काढून टाकणे. त्याच्यासाठी साधन म्हणून यांनी स्वत: लोहाराकडे जाऊन एका लांब गजाच्या टोकाला धार काढून आणली आहे. तिसरा उद्योग म्हणजे 'झपूर्झा'च्या वरच्या मजल्यावर जाऊन, इतरांच्या स्वैयंपाकघरातील खिडकीतून, लांब काठीने ढोसून, लोंबत असलेली सुकलेली सुरमाडाची पाने पाडवणे. का तर ती खाली बसणाऱ्या मुलांच्या डोक्यात पडतील म्हणून. (तिथे खाली आम्ही म्हाताऱ्याही बसतो; पण त्यांची दयामाया यांना नाही!) आता 'झपूर्झा'तील मंडळी यांना नको तरी कसे म्हणणार! पण इतरांच्या स्वैयंपाकघरात शिरून हा उद्योग करावा लागतो, याचा विवेक यांना नाही. यांचे विचाराशी जमते; पण विवेकाशी नाही. पहिला उद्योग यांना वीस वर्षांपूवीर् पुन्हा 'स्लिपडिस्क' झाले व वाकता येईना तेव्हा थांबला; पण दुसरे दोन उद्योग गेल्या वषीर्पर्यंत सुरू होते. 


निवृत्तीचा सगळ्यांत मोठा उद्योग म्हणजे काळजी करणे : तरुणपणी मुलांच्या लहानसहान दुखण्याची केली; आता म्हातारपणी नातवंडांच्या दुखण्यांची आणि इतरही अनेक काळज्या. विशेषत: एकेकाळी अमृताचा खोकला व अपूर्वाचे पाय दुखणे वगैरे. पण सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे टी. व्ही. व डोळे. यांनी टी. व्ही. किती अंतरावरून पाहावा, प्रकाश कसा असावा, यासंबंधी तज्ज्ञांकडून माहिती करून घेतलेली आहे. हे स्वत: कधी टी. व्ही. पाहातच नाहीत; पण आम्ही टी. व्ही. पाहत असलो तर आमच्यावर बारकाईने लक्ष असते. विशेषत: मी टी. व्ही. पाहत असले की यांना भयंकर संताप येतो. 'तू मूर्ख आहेस. नालायक आहेस.' वगैरे मला शिव्या. मग कधीतरी भांडणे व आरडाओरडा. पण भांडण, मला शिव्या, आरडाओरडा ही सगळी यांची तब्येत उत्तम असल्याची लक्षणे आहेत. असे काही नसले म्हणजे निश्चित काहीतरी बिघडलेले आहे असे समजावे. 


मुलांशी खेळताना मात्र हे मुलांपेक्षा मूल होतात. नातवंडे लहान होती तेव्हा त्यांच्यापुढे 'अरे-तुरे,' 'वेताळ', 'पंचमहाल,' 'पिशी मावशी' अशी अनेक भूते होऊन ते यायचे. रात्री तासन्तास तिंबूनानांच्या अलिखित गोष्टी सांगत राहायचे. आता नातवंडे मोठी झाली आहेत; त्यांच्याबरोबर अनेक विषयांवर गंभीरपणे चर्चा करतात. 


असे हे करंदीकर : अरेरावी, उर्मट, भांडखोर आणि संतापी; पण आतून अतिशय भाबडे आणि हळवे. तोंडाला येईल ते फडाफडा बोलून मन दुखावणारे; पण जीव तोडून प्रेम करणारे. वरवर अतिशय कंजूष व काटकसरी; पण प्रसंग आला तर नेसलेलेही सोडून देण्याची तयारी असलेले. 


तेव्हा करंदीकरांच्यासारखा प्रतिभावंत, बुद्धिवान आणि थोर विद्वान असा नवरा मिळाला हे माझे सात जन्माचे भाग्य. मी एक सामान्य बाई; एका जन्मीचे नव्हे, आपल्या जुन्या धर्मकल्पनेप्रमाणे सात जन्मांचे माझे पूर्वसुकृत. हे सर्व अगदी खरे; पण करंदीकरांना माझ्यासारखी शांत, समजूतदार (माझ्या मते), त्यांना समजून घेणारी आणि त्यांच्या अरेरावीने नाउमेद न होणारी, विवेकी बायको मिळाली हे करंदीकरांचेही भाग्यच. दुसरी एखादी कर्तबगार, हुशार बायको मिळती तर एव्हाना चारदा घटस्फोट झाला असता!
(मौज प्रकाशन गृहाने प्रसिद्ध केलेल्या सुमा करंदीकर यांच्या 'रास' या पुस्तकातील संपादित अंश)

कविता आपल्यासाठी ठेवून गेले : विजया राजाध्यक्ष



गेले महिनाभर विंदा आजारी होते. मध्यंतरी हॉस्पिटलमधून ते परत आले तेव्हा त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी, पुण्याच्या साहित्य संमेलनात कोणती कविता वाचणार, असे विचारताच, त्यांनी 'यंत्रावतार' असे सांगितले. विंदा कविता वाचायला लागले की, त्यांच्यात काही तरी संचारायचे. त्यांना वेगळेच बळ यायचे. त्या कविता ऐकताना अपार आनंद व्हायचा. 


विंदांनी अतिशय कष्टाचे आयुष्य काढले. ते आयुष्य इमानाने जगले. कवितेच्या क्षेत्रात, आकृतीबंधाच्या क्षेत्रात त्यांनी विलक्षण काम केले. त्यांच्या अध्यापन आणि कविता वाचनाने थक्क व्हावे, असेच त्यांचे कर्तृत्व! काव्यात्म जाणीवचे लघुनिबंधही त्यांनी लिहिले. माधव ज्युलियन यांचे त्यांच्यावर संस्कार होते. ते खूप पुढे गेले असले तरी ज्युलियनांना मात्र त्यांनी अखेरपर्यंत मानले. 


विंदांनी अभिजात साहित्यकृतींचा अनुवाद केला. 'अमृतानुभवा'चे अर्वाचिनीकरण करताना तर त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना भारुन टाकते. इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक असल्याने ते अनुवादही अतिशय नेटका करायचे. नुसते अनुवाद नाही केले तर आवश्यक तेथे सुंदर टीपाही लिहिल्या. 


विंदांशी आपले नाते जुळले, ५०-६० वषेर् हे नाते जुळलेले आहे. कविता वाचकांपर्यंत पोहोचवायच्या या एका भावनेने त्यांनी कुठे कुठे कार्यक्रम केले. कष्ट घेतले. अडचणी सहन केल्या. वाचकांना भेटणे हा त्यांचा आग्रह असायचा. स्वभावाने करारी असलेल्या विंदांनी, जेव्हा सांगण्यासारखे नवे काही नाही, असे लक्षात आल्यावर कविता करणे थांबवले. हे धैर्य, निर्धार फार कमी लोकांकडे असतो. किंबहुना तसे कोणी सापडणेच कठीण आहे. ते तर प्रतिभावंतांचे लक्षण आहे. 


विंदांचे आणि आपले नाते अंतर्यामी जुळलेले होते. त्यांनी काही कवितांची भाषांतरेही केली. 'स्वेदगंगा'पासूनचा प्रवास आपल्याला माहितीच आहे. त्यांच्या काही अप्रकाशित कविताही मी वाचल्या आहेत. त्या प्रकाशित होतील की नाही, ते माहिती नाही. त्यांची मागील भावना मला माहिती नाही. 


इतक्या वेगळ्या प्रकारचे लिखाण करणारे, दैवी प्रतिभाशक्ती प्रसन्न असलेले विंदा, त्यांची कविता आपल्याजवळ ठेवून गेले आहेत. कविता ही त्यांची भावभूमी होती. 'देणाऱ्याने देत जावे... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे', असे म्हणणाऱ्या विंदांचा, देणे-घेणे हा स्वभावच होता. इतक्या लोकांना त्यांनी हात दिला, कधी आशीर्वादासाठी, कधी आधारासाठी, आनंदासाठी. ते हात आपल्या पाठीवर होते आणि ते सदैव राहतीलच! 

लेखन, वाचन करतच तो जगला : मंगेश पाडगावकर



माधव ज्युलिअन हे करंदीकरचे गुरू. सुरुवातीच्या काळात करंदीकरच्या कवितांवर माधव ज्युलिअनांचा प्रभाव होता. 'मृद्गंध'मध्ये तो जाणवतो. ज्युलिअन हे करंदीकरचं पूजास्थान होतं. खरं तर कुणाची पूजा करणं, हा करंदीकरचा स्वभाव नव्हता. पण ज्युलिअन यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता. 


करंदीकरची कोणती इच्छा अपुरी राहिली असेल, असं मला वाटलं नाही. त्याला जे लेखन करायचं होतं, ते त्याच्या पद्धतीनं त्यानं केलं. त्याला जेव्हा लेखन थांबवावंसं वाटलं, तेव्हा ते जाहीरपणे सांगून त्याने लेखन थांबवलं. त्यानंतरही लिहिण्याची ऊमीर् आली, तेव्हा त्याने स्तोत्र लिहिली होती. 


एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये करंदीकरमध्ये कधीच बदल झाला नाही. लेखन, वाचन करतच तो जगत होता. आमचं शेवटचं बोलणं झालं ते गेल्या २३ ऑगस्टला. मलाही जिन्यांची चढउतार झेपत नाही; पण त्याचा वाढदिवस होता, म्हणून त्याच्यासाठीच चार जिने चढून गेलो होतो. त्याला तेव्हा बरं वाटत नव्हतं. मी आलो, याचा त्याला खूप आनंद झाला. मला तो बसायला सांगायचा आणि आतमध्ये जाऊन झोपायचा. पुन्हा पाच मिनिटांनी यायचा, बोलायचा, पुन्हा मला बसण्यासाठी आग्रह करायचा आणि दहा मिनिटं बसायला सांगून झोपायला जायचा. त्यावेळी त्याला सतत चक्कर येत होती आणि विश्रांतीची गरज होती, हे जाणवत होतं. अशक्तपणाही जाणवत होता. वाढदिवसानंतर आमचं फार बोलणं झालं नाही. आणि आज अचानक करंदीकर गेल्याचा सकाळी फोन आला. आता मी एकटा पडलो. 

माणूसपण जपणारे कवी : किशोर कदम



विंदांची कविता ही 'रोमॅटीसिझम'चा एक भाग होती. अर्थात, हा 'रोमॅटीसिझम' म्हणजे केवळ प्रेमभावना नव्हे. घटनांचे, सामाजिक पद्धतीचे दर्शन घडवणारा तो रोमँटीसिझम होता. त्याला विंदाचा असा एक वेगळा स्पर्श झालेला होता. त्याचे मुळ माधव ज्युलियनांपासून आलेल्या 'रोमँटीसिझम'मध्ये होते. अर्थात, ज्या ज्या लोकांवर पाश्चात्य साहित्याचा प्रभाव पडला आहे, त्यापैकी विंदा एक होते. दि. पु. चित्रेंची कविता त्या प्रभावामुळे इंग्रजाळलेल्या मराठीत होती. परंतु अरुण कोलटकर आणि विंदावरील प्रभाव वेगळा होता. पाश्चात्य साहित्य पचवून ते त्यांच्या कवितांत मराठीपण घेऊन आले. 


वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदाच्या कवितांमधील मुख्य फरक हा विंदांच्या कवितांतील वजनदारपणाचा दिसतो. त्यांनी अॅरिस्टॉटल मराठीत आणला, विल्यम शेक्सपीअरशी सलगी केली. त्या प्रभावाला मराठीच्या इतिहासाची, परंपरेची जोड देऊन आलेली त्यांची कविता वजनदार बनली. बापट आणि पाडगावकर यांची कविता त्यामानाने अधिकतर रोमँटिसिझमच्या जवळ जाणारी वाटते. विंदांच्या कवितेतील सामाजिक भाव, बांधिलपणा चोखंदळ वाचकांच्या निश्चित लक्षात येईल. 


विंदा, ९२ वषेर् जगले. ते तरुण आणि मध्यमवयीन कवी, साहित्यिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा होते. त्यांच्या उत्साहामुळे नेहमीच त्यांचा आधार वाटायचा. माणसाचे माणूसपण जपणारे ते कवी होते. तरुणांनाही त्यांच्याविषयी पेम वाटायचे. विंदाकडे जायला कोणत्याही तरुण कवीला भीती वाटली नाही. सगळ्याच मोठ्या कवींच्याबाबतीतील हा अनुभव असा असतोच, असे नाही. 


आधुनिक काळावर त्यांचा विश्वास होता. 'यंत्रावतार' ही कविता ते वारंवार सादर करायचे. पुन्हा पुन्हा ती वाचायची. कविता वाचताना त्यांच्यात वेगळीच ऊर्जा जाणवायची. वय, आजारपण हे सगळे त्यात लपून जायचे. कवितेत निरनिराळे प्रयोग करणारे, अॅरिस्टॉटल मराठी आणणारे विंदा बाल कवितातही तितकेच रमायचे. त्यांनी सुंदर बाल कविता लिहिल्या. कवितांचे सगळे फॉर्म त्यांनी यशस्वीपणे हाताळले.


आम्ही 'काव्योत्सव २००१' हा कवितांचा कार्यक्रम केला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून विंदाना आमंत्रण द्यायला गेलो. त्यांनीही सहज होकार दिला. दि. पु. चित्रे यांनी 'काव्योत्सवा'वर टीका केली होती. असे काव्योत्सव भरवून कविता मोठी होत नाही, असे ते म्हणाले होते. साधे लिहितो, साधे राहातो तो तितकाच मोठा होता, हे दिपुंना कळले नाही. मात्र विंदानी ते ताडले होते. 


किंग लिअरचा राजा लिअरसारखा अनुवाद विंदासारखेच साहित्य पचवलेली व्यक्ती करु शकते. जे पाश्चात्य साहित्यात वजनदार, कसदार होते, ते ते मराठी वाचकांपर्यंत आणण्याचे व्रत घेऊन विंदांनी अनुवाद केले. 


विंदांच्या कविता वाचनात प्रचंड नाट्यमयता होती. त्यामुळे त्यांचे वाचन 'सुश्राव्य' व्हायचे. त्या कवितेत विस्मयकारक नाट्यमता असायची, प्रत्येक चांगल्या कवितेची ही आवश्यक गुणवत्ताच मानायला हरकत नाही. मराठीतील जड शब्द एकामागोमाग एक ठेवून जे साध्य होत नाही, ते विंदांच्या सहज शब्दांनी केले.

विंदा करंदीकर यांची साहित्यसंपदा



कविता - 


स्वेदगंगा (१९४९), मृद्गंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८), विरूपिका (१९८१), अष्टदर्शने (२००३) 


संपादित काव्यसंग्रह - 


संहिता (१९७५): संपादक- मंगेश पाडगावकर, आदिमाया (१९९०) : संपादक- डॉ. विजया राजाध्यक्ष


बालकविता - 
राणीची बाग (१९६१), एकदा काय झाले (१९६१), एटू लोकांचा देश (१९६३), सशाचे कान (१९६३), परी ग परी (१९६५), अजबखाना (१९७४), सर्कसवाला (१९७५), पिशीमावशी आणि तिची भुतावळ (१९८१), अडम् तडम् (१९८५), टॉप (१९९३) सात एके सात (१९९३), बागुलबोवा (१९९३), अल्लख बिलंदर (२००६) 


ललितनिबंध - 


स्पर्शाची पालवी (१९५८), 
आकाशाचा अर्थ (१९६५), 
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (१९९६) 


समीक्षा - 


परंपरा आणि नवता (१९६७), 
उद्गार (१९९६) 


अनुवाद - 
अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (१९५७), 
फाउस्ट भाग १ (१९६५), 
राजा लियर (१९७४) 


अर्वाचिनीकरण - 


संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचिन मराठीत रुपांतर (१९८१) 


भाषणे, मुलाखती, पत्रे - उद्गार 
इंग्रजी समीक्षा - लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (१९९१), अक्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (१९७७) 


इंग्रजीतील अनुवाद 
इंग्रजी- पोएम्स ऑफ विंदा (१९७५), त्रिमूतीर् : थ्री मेजर पोएम्स (१९७९), सम मोअर पोएम्स ऑफ विंदा (१९८३), ओंकार (१९९६) 


गुजराती अनुवाद 


विंदा करंदीकर १९७७ (अनुवादक -डॉ. जया मेहता), अरिस्टॉटलनु काव्यशास्त्र (१९८५, अनुवादक -डॉ. जया मेहता, डॉ. जसवंती दवे) 


हिंदी अनुवाद 


यह जनता अमर है (संपादक- चंदकांत बांदिवडेकर) 


विंदा करंदीकर यांच्यावरील पुस्तके 


लेणे प्रतिभेचे- विंदा करंदीकर: एक अभ्यास- गीता जोशी 
बहुपेडी विंदा खंड १ आणि २- संपादक - विजया राजाध्यक्ष 
विंदा - संपादक- रामदास भटकळ आणि सुषमा पौडवाल 

पुरस्कार आणि सन्मान

सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०) 


कुमारन् आसन् पुरस्कार (१९७०) 


महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५) 


कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७) 


कबीर सन्मान (१९९१) 


कोणार्क पुरस्कार (१९९३) 


जनस्थान पुरस्कार (१९९३) 


टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी. लिट्. (१९९४) 


साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६) 


महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७) 


भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९) 


डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२) 


ज्ञानपीठ पुरस्कार (२००६, 'अष्टदर्शने'साठी) 


( म.टा.वरून साभार )

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार