शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

सलाम सुर्वेसर : प्रज्ञा दया पवार

सुर्वेसरांच्या निधनाची दु:खद वार्ता कळली आणि आपण काहीतरी मोलाचं असं कायमसाठी हरवून बसलो आहोत, ही जाणीव झाली. कवी देखील माणसंच असतात आणि त्यांचेही पाय मातीचेच असतात हे खरंच. पण सुवेर्सरांसोबत जितक्या वेळी मी होते, जितका काळ त्यांच्यासोबत वावरले, सभासंमेलनात सहभागी झाले, तेव्हा प्रत्येक वेळी हे जाणवत गेलं की हा एक श्रेष्ठ कवी तर आहेच पण त्याआधीही एक 'माणूस' आहे-एक निखळ, निगवीर्, निरसल माणूस. त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातून आणि त्यांच्या कवितेतून घालून दिलेल्या मार्गातून चालणं अवघड तर खरंच पण त्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. समस्त कामगार, कष्टकरी वर्गाची, स्त्रियांची वेदना आणि विदोहाचा हुंकार ताकदीने व्यक्त करणारी त्यांची कविता आजही आमच्या पिढीला दिशादर्शक आहे

क्रांतिकारक समुदायासोबत मिरवणुकीत चालताना जो एक अपूर्व आनंद असतो, एकोपा व आपल्या ध्येयधोरणांचा विश्वास दृढ होत जातो, तो आनंद कोणत्याही ग्रंथापेक्षा मला नेहमीच प्रेरक वाटत आलेला आहे. तेव्हा आम्ही 'आम्ही' असतो आणि समारेचे सगळे जग आमच्या मुठीत असते. तो एक आमच्या इच्छांचा आणि अपेक्षांचा महान उत्सवच असतो, असं सुवेर्सरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. हे मला फार महत्त्वाचं यासाठी वाटतं की आज कवितेमधून हा 'आम्ही'च...एकतर हरवला आहे नाहीतर ढोबळ-प्रचारीपणे अवतरला आहे.

'आम्ही' आणि 'मी' यात कसलंच अंतर नसणं आणि एका गतीमान परिवर्तनाच्या प्रक्रियेशी आंतरिकपणे जोडलेलं असणं हा सुवेर्सरांचा वारसा मी मानते.

सुवेर्सरांच्या सबंध काव्यविश्वाबद्दल खूप लिहिता येईल, निरनिराळी अर्थनिर्णयनं करता येतील आणि ते होतही राहील. पण त्यांच्या कवितेतील स्त्री-रूपांनी मला अधिक प्रभावित केलं आहे, बांधून ठेवलं आहे.

'आता बगा, सांगू का नगं सांगू

असंबी होतंय आन् मला हसूबी येतंय

मागं याक गिऱ्हाईक आलं,

हितं ऱ्हान्यापरीस बाई व्हशील का म्हनलं;

म्या म्हनलं आता मी हाय की तुमज्या शेजंला

तवा ते तरपाटलं, अन मला बगा आख्ख्या पुरुसजातीचं हसू आलं

आन् रडूबी आलं'

आख्ख्या पुरुषजातीचं हसू येणं आणि रडू येणं ही माझ्या मते पुरुषी व्यवस्थेत वावरणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या नात्याच्या प्रतवारीसंदर्भातील अत्यंत करुण आणि वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया तर आहेच पण ती या व्यवस्थेला लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. 'मनिऑर्डर' या कवितेतील ही स्त्री काय किंवा त्यांच्या कवितेत जागोजागी आढळणाऱ्या असंख्य लढाऊ स्पिरिट असलेल्या कष्टकरी स्त्रिया काय, या सगळ्याजणी माझ्या कवितेत कायमसाठी वास्तव्याला आलेल्या आहेत हे मात्र खरंच.

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार