शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

सुर्वे कधीच एकटे नव्हते... : जयंत पवार

उस्मान अली, शीगवाला, दाऊदचाचा, याकूब नालबंदवाला, पोर्टर, पोराला घेऊन शाळेत आलेली वेश्या, बेरात्री रस्त्यावर पोस्टर्स डकवत फिरणारी पोरं, बिगारी नाक्यावरचे हमाल, बॉबिनीला तार जोडणारा कामगार... हे सगळे कोण आहेत? रस्त्यावरच्या ह्या 'टिनपाट' समजल्या जाणाऱ्या माणसांना मराठी साहित्यात कोणी आणलं आणि पुस्तकांतल्या ओळीत सन्मानाने बसवलं? हा प्रश्ान् कधीकाळी मराठी सारस्वत जगताला पडलाच असणार. पण आपल्या आगमनातच नारायण गंगाराम सुवेर् नावाच्या माणसानं सांगून टाकलं, 'कामगार आहे मी तळपती तलवार आहे/ सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे'. तो आला. आपलं कामगारपण घेऊन आला. आपलं अनाथपण घेऊन आला. आपल्या रोखठोक आणि बोलभाषेतल्या शब्दांसह तो आला आणि त्याने मराठी सारस्वतांच्या अनुभवाच्या परिघाबाहेरचं विश्व त्यांच्यासमोर ओतत आपले बिरादर मराठी साहित्यात आणले. एखाद दिवशी एक नवाच दादा गल्लीच्या तोंडावर अवतरतो आणि 'है आवाज...' म्हणत ललकारतो तसा सुर्व्यांचा खणखणीत आवाज मराठी साहित्यात साठच्या दशकात घुमला. आज हा दादाकवी इहलोक सोडून गेला आहे आणि त्याचे शीगवाला, उस्मान, याकूब, पोर्टर अनाथ झाले आहेत.

स्वत: नारायण सुवेर्ंनी हे अनाथपण खोलवर अनुभवलं आहे, झेललं आणि साजरंही केलं आहे. चिंचपोकळी येथे गिरणीच्या तोंडावरच त्यांची जन्मदात्री त्यांना टाकून गेली होती. गंगाराम सुवेर्ंनी हे अनाथ पोर उचललं आणि घरी आणलं. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत सांभाळलं आणि एके दिवशी त्याच्या हातावर दहा रुपये ठेवून ते कुटुंबासह गावी निघून गेले. नारायण पुन्हा अनाथ झाला. 'ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' हे वास्तव जगू लागला. आयुष्याच्या नव्या धुमाळीत उघड्या आकाशाखालचं जग हेच त्याचं विद्यापीठ झालं आणि या विद्यापीठात उघड्या डोळ्यांनी शिकता शिकता 'माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय' बिनदिक्कत लिहिण्याइतका मोठा कवी झाला. सुर्व्यांनी आपल्या या अनाथपणाची नाळ थेट कबिराशी जोडून घेतली. कबीरही त्याच्या आईबापाला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडला होता. एका विणकरानेच त्याचा प्रतिपाळ केला आणि 'कबिरा खडा बाजार में लिए कटोरा हाथ' असं म्हणत आपलं भणंगपण साजरं करत एक युगविधान करणाऱ्या कवीमध्ये तो परावतिर्त होत गेला. सुवेर् नेहमी आपल्या भाषणात कबिराची साक्ष काढत आणि त्याच्या-आपल्या अनाथपणाचा एकत्रित उल्लेख करत.

कवी-लेखकाने आपलं एकटेपण मिरवायची एक फॅशन मराठीच नव्हे, सगळ्या भाषांतल्या साहित्यिकांत होती. एकटेपणा-बरोबरच दु:खही त्यालाच घट्ट लपेटून माणसाच्या आयुष्यात प्रवेश करतं, हाही एक क्रिएटिव्ह लोकांचा आवडता समज. सुवेर् तर मानसिकदृष्ट्याच नव्हे तर भौतिकदृष्ट्याही एकटे होते. वडील त्यांना पोरवयात सोडून गावी गेल्यानंतर ते चाळीच्या जिन्याखाली झोपायचे. एका सिंधी माणसाने ह्या एकट्या पोराला पाहून 'क्या करता है?' विचारलं. पोरगं म्हणालं, 'कुछ नई. कोई नही है मेरा'. त्यावर सिंध्याने त्याला आपल्याकडे नेलं आणि झाडू मारायचं काम दिलं. तिथून पोरगा एका पारश्याकडे गेला. त्याच्या मुलाला शाळेतून आणणं, बाजारहाट करणं, असं काम करू लागला. शेजाऱ्यांची भांडीकुंडी घासू लागला. मग कधीतरी दादरच्या कोहिनूर मिल नं. ३ मध्ये रात्रपाळीत बालकामगार म्हणून रूजू झाला. पोटासाठी दोन घास मिळावेत एवढ्याचसाठी ही कोण धडपड. तीही एकटेपणाने केलेली. राग, अपमान, अवहेलना आणि आत्मवंचना यांचीच या प्रवासात सोबत. असा माणूस आत्मानुभवातून साहित्य प्रसवतो तेव्हा त्यात ह्या दु:खाचं विदारक दर्शन असणारच ना! पण सुर्व्यांचं वेगळेपण आणि थोरपणही हेच की त्यांनी या कटुतेचा गाळ आपल्या साहित्यात येऊ दिला नाही, उलट आपली आत्मपरता समूहात विलीन करून टाकली आणि समष्टीची वेदना स्वत:ची म्हणून मांडली.

हे कसं काय झालं असेल? मिलमध्ये काम करताना गंगाराम सुर्व्यांच्या नातेवाईकाने त्यांना युनियनच्या ऑफिसात झाडू मारण्याचं काम देऊन तिथेच राहायची सोय केली, त्यांना युनियनची पावती फाडायला लावली. हे निमित्त झालं आणि सुर्व्यांना कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाची गोडी लागली. मार्क्स भेटू लागला. तू एकटा नाहीस, तुझ्यासारखे खूप आहेत गांजलेले, असं सांगू लागला. त्यातूनच त्यांना चळवळीची गोडी लागली. ते नाविकांच्या बंडात रस्त्यावर उतरले. पुढे स्वातंत्र्य आंदोलनात 'पीपल्स व्हॅालेंटियर ब्रिगेड'मध्ये बिनदिक्कत सामील झाले आणि लाठ्यांचे धनी झाले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात प्रचार करत फिरले. त्यात गाणी लिहू लागले. एकटे असलेले सुवेर् समूहाचे झाले.

अर्थात यात स्वत:विषयी विचार करायला त्यांना वेळच मिळाला नसेल, असं नाही. त्यांच्या 'ऐसा गा मी ब्रह्मा' कवितेत 'गलबलून जातो तेव्हा तुझ्याच कुशीत शिरतो' यासारख्या भावनिक ओळी आहेत. त्यांनी स्वत:बद्दलही वारंवार विचार केल्याचं त्यांच्या कवितेतून दिसतं. पण हा स्वत:चा विचार त्यांनी एक व्यापक पट समोर ठेवून केल्याचं दिसतं. यात त्यांच्यातलं मुळात असलेलं लढवय्येपण कायम दिसतं आणि त्याचबरोबर करूणाही दिसते. लहानपणी त्यांना अनाथ करून गेलेल्या मातेच्या उल्लेखातही त्यांनी कधीच कटुता येऊ दिली नाही. पोरवयात मुंबई शहरात त्यांना एकटं सोडून जाणाऱ्या गंगाराम सुवेर्बद्दल राग तर नाहीच उलट अपार कृतज्ञता आहे. याच करुणामय दृष्टीने सुर्व्यांनी आपल्या अनुभवविश्वात वावरणाऱ्या रस्त्यावरच्या फाटक्या माणसांशी वागताना, त्यांचं कवितेत चित्रण करताना बाळगली आणि म्हणूनच त्यांची कविता मोठी झाली. सुवेर्ंनी आपल्या समकालिन आणि विरोधी विचारांच्या लेखक-कवींनाही आदराने वागवलं. पुढे वयपरत्वे त्यांनी वादात न पडता कधी कधी समजुतीचा आणि समझोत्याचा सूर लावला तेव्हा ते टिकेचे धनीही झाले पण हे सौम्यपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच झिरपल्याने ते सर्वसमावेशक झाले आणि सर्वांनी त्यांना स्वीकारलं.

सुवेर् कविता म्हणायला उभे राहायचे तेव्हा सभा स्तब्ध व्हायची. 'तुमचंच नाव लिवा' असो की 'असं पत्रात लिवा', 'गिरणीची लावणी असो' की 'मढेर्करांशी बातचीत असो' त्यांचा शब्द झेलायला सगळे आतुर असायचे. असा दरारा त्यांनी आपल्या सौम्य पण जरबदार आवाजाने आणि त्यात पेरलेल्या मृदू शब्दांनी निर्माण केला होता. सुर्व्यांनी एकंदरीत फार कविता लिहिल्या नाहीत, पण ज्या लिहिल्या त्यातल्या बऱ्याचशा लक्षात राहिल्या. साहजिकच कविता म्हणताना अनेकदा ते त्याच त्याच कविता म्हणत. पण रसिकांनी त्याच त्या कवितांवरही अतोनात प्रेम केलं. ते प्रेम घेत, त्यात सुखावून जात आणि दु:खाचा अजिबात बाऊ न करता सुवेर् कविता म्हणत राहिले. कवितालेखन थांबलं तेव्हाही कधी नेरळला, कधी नाशिकला, कधी ठाण्याला वास्तव्य करत बिनतक्रार जगत राहिले. मृत्यूलाही झुंजवत राहिले. त्या मृत्यूनेही अखेर त्यांच्या झुंजारपणाला लाल सलाम केला असणार.

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार